'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत', मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा

आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

Updated: Oct 4, 2021, 01:37 PM IST
'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत',  मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा title=

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेले बंद असणाऱ्या शाळांचे दरवाजे आज तब्बल दिड वर्षांनी उघडले. मुंबईसह राज्यात आज 8 ते 12 वर्गाच्या शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने आज शाळा पुन्हा एकदा गजबजून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झालं. यानंतर मुख्यममंत्र्यांनी विद्यार्थींशी संवाद साधला. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक काळा आता सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणं कठीण होतं, कारण मुलांची काळजी घेणं महत्त्वाचं होतं. खूपच काळजीपूर्वक घेत आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शाळेच्या आठवणींनाही उजाळा दिला.

मुख्यमंत्र्यांनी केल्या सूचना

शिक्षकांनी स्वत: बरोबर विद्यार्थ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या. शिक्षणाची जागा बंधिस्त असता कामा नये, दारं खिडक्या उघड्या असायला हव्यात, निर्जुंतुकीकरण करताना विद्यार्थी आसपास नाहीत याची काळजी घ्या, विद्यार्थी जिथे बसतील तिथे त्यांच्यात अंतर असलं पाहिजे, शौचालयांची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

कोरोनाने आपल्याला काय शिकवलं याचा अंदाज घेऊन त्या दिशेने आपलं पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं ही सरकारची जबाबदारी आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी मी सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, आपण सगळे एकत्रित राहून कोरोनाशी लढूया, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत या निर्धाराने सुरुवात करुया असं म्हटलं आहे.