मुंबई : द सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी लोअर परेल इथल्या बँकेच्या मुख्य शाखेला भेट दिली. त्यांच्या भेटीला शिवसैनिक विरोध करण्याच्या शक्यतेने सिटी बँकेबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सिटी बँक प्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याप्रकरणी आज राणा मुंबईत आले आहेत.
'आनंदराव अडसूळ हे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन असताना 400 कोटींच्या कर्ज वाटप प्रकरणात घोटाळा झाल्या प्रकरणी ईडी चौकशी करीत आहे. कर्जाच्या रक्कमेतील 20 टक्के कमिशन अडसूळ यांनी घेतलंय. यात बँकेचे सीईओ अथर्व रिबेलो यांचाही सहभाग आहे.आनंदराव अडसूळ यांचे जावई आणि मुलगा यांनीही सिटी बँकेच्या कर्ज वाटपात सहभाग असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.' असे राणा यांनी म्हटले आहे.
'चारशे कोटींच्या कर्जवाटपात गैरप्रकार झाला असल्यामुळे पुन्हा एकदा ईडीकडे या सर्व गैरव्यवहाराची माहिती देणार आहे. ज्यात सिटी बँकेच्या अधिका-यांचीही नावे आहेत. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना काहीही झाले नसून गोरेगावच्या SRV रुग्णालयात खोट्या पद्धतीने ऍडमिट करून घेतलंय. त्यामुळे हॉस्पिटलवरही कारवाई झाली पाहिजे.' असेही राणा यांनी म्हटले आहे.