मुंबई : कोविड-१९ संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या. गेल्या आठवड्यात मुंबईतील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील आपण कुठेही गाफील न राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही, तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच त्यांना वेळीच अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
मंत्रिमंडळ बैठकीत #COVID_19 संदर्भातील सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिका क्षेत्रात #कोविड रुग्णांच्या शोधासह त्यांचे संपर्क शोधण्यावर भर देण्याबाबत सर्व मंत्र्यांना दिल्या सूचना. सर्व पालिकांनी यादृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे आदेश. pic.twitter.com/J6gsLisTBv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 29, 2020
पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा १ सप्टेंबरनंतर बंद करण्याचे केंद्राने सांगितले आहे. मात्र, आपण पंतप्रधान मोदी यांना हा पुरवठा पुढील काळात देखील सुरु ठेवावा, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्यूदर आता ३.६२ टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २७ दिवसांवर गेला आहे.
मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस झाला आहे. दर १० लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, असे प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.