मोठी बातमी: धारावीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती. 

Updated: Apr 2, 2020, 01:13 PM IST
मोठी बातमी: धारावीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण title=

मुंबई: धारावी परिसरात गुरुवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. हा व्यक्ती मुंबई महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी (वय ५२) आहे. हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती. यादरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. सध्या या सफाई कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्का आलेल्या २३ सहकाऱ्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. 

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या घटनेमुळे मुंबईत कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कालच धारावीतील एका कोरोनाबाधिताचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. धारावी हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने वेळीच पावले न उचलली गेल्यास कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची भीती आहे. 

येत्या काही तासांमध्ये मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात असलेले तब्बल साडेपाच हजार जण हाय रिस्क कॅटेगरीत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. 

तत्पूर्वी मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग परिसरातही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. या व्यक्तीला परदेशी प्रवास किंवा कोरोनाबाधित नातेवाईक अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याला कोरोनाची लागण झाल्याने यंत्रणा चक्रावल्या आहेत. वरळी परिसरातही कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर वरळी-कोळीवाडा आणि आदर्शनगरमधील ८६ जणांना पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.