मुंबई : डिस्टंस अँड ओपन लर्निंगच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र विभाग आयडॉल दरवर्षी एफवाय पासून ते मास्टर्स पदवीपर्यंतचे सर्व शाखांचे प्रवेश करतं. दरवर्षी आयडॉलमध्ये तब्बल 80 हजार पर्यंत प्रवेश होतात. मात्र यंदा आत्तापर्यंत केवळ 45 हजाराच्या घरात प्रवेश झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
10 सप्टेंबरपासून हे प्रवेश सुरु झाले असून 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश सुरु राहणार आहेत. मात्र असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत आयडॉलकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलीय. यामुळे मुंबई विद्यापीठाचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे.
सध्या झालेल्या प्रवेशानुसार यावर्षी विदयापीठाचे जवळपास 10 कोटी नुकसान झाले असून पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यामुळे पुढील दोन वर्षाच्या शुल्काचे नुकसानही विद्यापीठाला होणार आहे.
आयडॉलच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षाचे मिळून जवळपास 20 कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. माजी कुलगुरु डॉ.संजय देशमुख आणि आयडॉल संचालकांनी एक्झॉन कंपनीचा तीन वर्षाचा करार यावर्षी मोडून नव्याने एमकेसीएल कंपनीशी करार केल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे संपूर्ण प्रक्रीया सुरु होण्यासाठी दोन महिने उशीर झाला असल्याचा आरोपही करण्यात येतोय.