मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. समाजातील इतर घटकांनीही आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं रहावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. शेतकरी आंदोलनावर बोलताना शरद पवार म्हणाले, हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवायचा नाही, राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा शब्द पाळला नाही, शब्द पाळण्याची त्यांची नियतही दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देखील शेतकऱ्यांना शरद पवारांनी दिला आहे.
आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की, त्यांनी रस्त्यावर दुध ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हे प्रकार टाळता आले तर टाळावेत. गरीब वर्गात हा माल वाटावा, याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही, आणि सरकारला तुमचा आक्रोश या माध्यमातून दिसेल आणि गरीबांची सहानुभूती मिळेल. उत्पादन खर्चावर ५० % नफा, हा शेती मालाच्या किंमतीचा आधार धरला जाईल, आणि त्यापद्धतीने पाऊले टाकले जातील, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी ४ वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात दिलं होतं.
पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या ४ वर्षात झाली नाही. सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी पहिल्यांदाच करत नाही. गेल्या दोन-तीन वर्षात कधी दिल्लीत, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्य प्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात शेतकरी सातत्याने रस्त्यावर येत आहे, आणि आपली भूमिका मांडत आहे. माझी देशवासीयांना विनंती आहे की बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही, त्याला अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
शेतकऱ्याला व्यवसाय करणं अशक्य झालं आहे. तो कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बळीराजा टोकाची भूमिका घेत आहे. या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल, असं कोणतंही काम शेतकऱ्यांनी करू नये, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.