आताची मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, पाहा शिंदे गटाला किती खाती मिळणार?

Updated: Jul 10, 2022, 09:32 AM IST
आताची मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? title=

Maharashtra Shinde Government : राज्याच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार आषाढी एकादशीनंतरच होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्पष्ट केलं आहे. दिल्लीत भाजपच्या (Shinde) केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं. विस्तार हा 12 किंवा 13 जुलैला होईल, हे वृत्त झी 24 तासनं दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. 

भाजप सेना युतीचं जे सरकार अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं ते आता आम्ही केलं आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. 5 वर्ष ज्यांनी खूप चांगलं काम केलं. शेतकरी आणि लोकहिताचं काम केलं ते मधल्या काळात खंडीत झालं. ते आम्ही पुन्हा पुढे नेणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कसा असेल खातेवाटपाचा फॉर्म्युला
मंत्रिपदाच्या संधीसाठी परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत झाल्याचीही माहिती आहे. विभागीय निकषांसोबतच मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती याचाही विचार करुन मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. दीड पावणे दोन वर्षातच लोकसभा निवडणूक येत आहे. त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे कमी कालावधीत तगदा परफॉर्मन्स मंत्र्यांना दाखवावा लागणार आहे.

कोणाला मंत्रीपद मिळणार याची धागधुक आमदारांमध्ये  आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे नगरविकास खातं आणि सामान्य प्रशासन हे स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी खाती होती त्यातली बहुतेक खाती ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे जी खाती होती ती शिंदे गटाकडे राहतील. शिंदे गटाला एकूण 12 ते 14 कॅबिनेट राज्यमंत्री पद मिळतील आणि भाजपाकडे उर्वरित मंत्रीपद असतील.

भाजपा स्वतः कडे गृह, वित्त नियोजन, महसूल , सार्वजनिक बांधकाम, उर्जा, जलसंपदा , गृहनिर्माण, विधी व न्याय सारख्या महत्वाची खाते ठेवण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, एमएसआरडीसी ,उद्योग, कृषी, शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, समाज कल्याण, जलसंधारण, पाणी पुरवठा, पर्यावरण यासह काही महत्वाची खाते असतील.