Maharashtra Politics : शिंदे गटाकडून (Shinde Group) तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात
१. बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला आहे.
शिंदे गटाची काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत देखील शिंदे गटाने नवीन चिन्ह आणि नावाबाबत चर्चा केली. बैठकीत निवडणूक चिन्हाबाबत शिंदे गटाचं तीन चिन्हांवर एकमत झालं. आज निवडणूक आयोगाकडे चिन्ह संदर्भात प्रस्ता सादर केला. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निश्चित करण्यात आली आहेत. यात त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्ह ठाकरे गटानेही दिली आहेत. त्यानंतर आता त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हावर शिंदें गटानेही दावा केला आहे. त्यामुळे या चिन्हांवरुनही दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबईतून 'शिवसेना' हद्दपार होणार?
ठाकरे आणि शिंदे गटातला हा वाद पुढचे 4-5 महिने सुरूच राहिल, असा अंदाज आहे. दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करायला वेळ लागेल. त्यामुळं निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल येण्यासाठी पुढचं वर्ष उजाडेल, असंही म्हटलं जातंय. आगामी महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्हींच्या वापरावरचा बंदी आदेश कायम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली...
1985 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर चार वर्षांचा अपवाद वगळता गेली ३७ वर्षं शिवसेना आणि धनुष्यबाणाचीच सत्ता मुंबईवर राहिलीय.. पण पुढच्या निवडणुकीत हे शिवसेना आणि धनुष्यबाण इतिहासजमा होणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष असणाराय.