सोमय्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, तर किरीट सोमय्या ईडी कार्यालयात

संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले.

Updated: Apr 7, 2022, 01:33 PM IST
सोमय्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, तर किरीट सोमय्या ईडी कार्यालयात title=

मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल आयएनएस विक्रांतसाठी निधी जमा करून तो हडपल्याचा आरोप केला. 58 कोटीचा हा निधी त्यांनी परस्पर हडप करून आयएनएस विक्रांतसंदर्भात देशभावनेचा बाजारात लिलाव केला. महाराष्ट्र सर्व खपवून घेईल पण देशविरोधात काही खपवून घेणार नाही. राज्यात यावर आंदोलन छेडण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. औरंगाबादेत किरीट सोमय्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. सोमय्या यांनी देशद्रोह केला आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका खैरे यांनी घेतली.

हिंगोलीतही शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ठाण्यातही शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले. सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी देत त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, अन्य नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईतही ठिकठिकाणी शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. फोर्ट येथील आयएनएस विक्रांतच्या स्मारक स्थळी शिवसेनेने आंदोलन केलं.

एकीकडे, शिवसेनेचे हे आंदोलन सुरु होतं तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी ईडी कार्यालय गाठलं. संजय राऊत यांच्या आरोपानंतर सोमय्या यांनी आपला मोर्चा जरंडेश्वर कारखान्याकडे वळविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर कारखान्याबाबत आपण ईडी कार्यालयाला भेट देणार आहोत, असा इशारा त्यांनी काल दिला होता. त्यानुसार त्यांनी बाधित शेतकऱ्यांसोबत कैसर ए हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ईडी कार्यालय गाठले.

जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कारखान्याचे ताबा शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केलीय.