शिवसेनेचं पुनरुज्जीवन? राणेंचं 'ते' वक्तव्य शिवसैनिकांसाठी ठरलं बुस्टर डोस

रस्त्यावरची लढाई हीच शिवसेनेची खरी ओळख, शिवसेना पुन्हा एकदा अॅक्शन मोड आली आहे 

Updated: Aug 25, 2021, 09:39 PM IST
शिवसेनेचं पुनरुज्जीवन? राणेंचं 'ते' वक्तव्य शिवसैनिकांसाठी ठरलं बुस्टर डोस title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  मुंबईच्या रस्त्यावर मंगळवारी तुफान राडा रंगला. नारायण राणे यांच्या जुहूतल्या घराखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईल आंदोलन केलं. खरं तर रस्त्यावरची लढाई हीच शिवसेनेची खरी ओळख. शिवसेना वाढली, मोठी झाली तीच मुळी अशा राडेबाज आंदोलनांमुळे. 

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना काहीशी थंडावली. मात्र, राणेंच्या वक्तव्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजप कार्यालयांवर शिवसेना स्टाईल हल्लेही केले. राणेंचं वक्तव्य एका अर्थानं शिवसैनिकांसाठी बुस्टर डोस ठरलं.

कट्टर उद्धव ठाकरे विरोधक असलेल्या नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली, तेव्हाच संघर्षाची ठिणगी पेटणार हे स्पष्ट झालं होतं. दादर शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणेंनी वंदन केलं, तेव्हा शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याचं वक्तव्य करून राणेंनी शिवसेनेला फुल टॉस दिला. सत्तेमुळं आलेली मरगळ झटकून शिवसैनिक पेटून उठले. युवा सेना सरचिटणीस वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक राणेंच्या घरावर चाल करून गेले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या युवा सेना कार्यकर्त्यांना वर्षावर बोलावून घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली...

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मंगळवारच्या राड्यामुळं शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झालाय. त्यात सत्तेचा आशीर्वाद चवताळलेल्या शिवसैनिकांच्या पाठिशी आहेच. त्यामुळं महापालिकेच्या आगामी महासंग्रामासाठी शिवसैनिकांना शंभर हत्तींचं बळ आलंय, एवढं निश्चित.