मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली. वरकरणी ही कारवाई म्हणजे ठाकरे विरुद्ध राणे राजकीय संघर्षाचा परिपाक असल्याचं मानलं जात असलं तरी या अटकेमुळं शिवसेना आणि भाजप यांच्यात कायमचा काडीमोड झाल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. कधीकाळी एकमेकांच्या युतीत असलेले मित्रपक्ष आता पक्के राजकीय हाडवैरी बनलेत.
शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे युतीतले मित्रपक्ष हिंदुत्वाच्या मुद्यावर पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले, तेव्हा दोघांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र राणेंच्या अटकेवरून जो काही संघर्ष महाराष्ट्रात पेटलाय, तो पाहता भाजप-शिवसेनेत कायमचा काडीमोड झाल्याचं स्पष्ट होत आहे.
जनआशिर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका सुरु केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीकेची झोड उठवली इतकंच नाही तर मुंबई महापालिकेतून शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा विडाच त्यांनी उचलला.
राणेंना अटक झाल्यानंतर शिवसैनिकांनी भाजप कार्यालयांवर हल्ले केले. त्यामुळं भाजप विरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडे रंगले. नारायण राणेंच्या पाठिशी भाजप उभा असल्याचं दिल्लीपासून कोकणातल्या नेत्यांनी दाखवून दिलं. भाजप नेत्यांनी शिवसेनेची तुलना थेट तालिबान्यांशी केली.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पंचप्राण आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची रणधुमाळी आहे. भाजपनं या रणसंग्रामाची जबाबदारी नारायण राणेंवर सोपवल्यानं भाजप-शिवसेना सामना आणखीच पेटणार आहे. त्यामुळे या राजकीय संघर्षात युतीचा पोपट कायमचा धारातीर्थी पडल्यात जमा आहे.