मुंबई : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याच्या निर्णयावरुन आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी माघार घेतली. दुपारी पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांनी घोषणा केली. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मुंबई दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये असं सांगत आमदार रवी राणा यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताच शिवसैनिकांनी (Shiv Sainik) जोरदार जल्लोष केला. 'भाग गया रे भाग गया रवी राणा भाग गया, जीत गयी रे जीत गयी शिवसेना जीत गयी' अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. तसंच मातोश्री (Matoshree) बाहेर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर पेढे वाटत जल्लोषही केला.
शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर चोवीस तास पहारा दिला, ते इतके घाबरले की पायही घराबाहेर ठेवू शकले नाहीत, ही शिवसैनिकांची ताकद आहे. आणि परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, असं युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान दौऱ्याचं केवळ कारण देत असल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी नौटंकी केली. त्याचं शेवटी काय झालं, मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती अजून जन्माला आलेली नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो मातोश्रीची, उद्धव ठाकरे यांची, शिवसेनेची ताकद ज्यांना पहायची होती, त्यांनी गेल्या दोन तीन दिवसात पाहिलेली आहे, कोणाचाही नाद करा, शिवसेनेचा करु नका असा इशाराही वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.