मुंबई : Uddhav Thackeray Interview : राज्यातल्या सत्तांतरानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध होत आहे. 'सामना'साठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. आपण रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना इथे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
सरकार गेलं याची खंत नाही पण माणसं दगाबाज निघाली याची खंत वाटते असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळं करण्याचा कट रचला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही आज सकाळी साडेआठ वाजता 'झी 24 तास'वर पाहू शकाल.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, शिवसेना कायद्याची आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही? या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी खुलासे आणि गौप्यस्फोट केले आहेत.
ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडले आहे, म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होते? काहीच सोडलेले नव्हते. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिले, हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोपं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.