मुंबई : राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. कार्यकारणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. बाळासाहेबांचं नाव कुणीही लावू नये असं या बैठकीत सांगण्यात आलं. शिंदे गट बाळासाहेबांचं नाव वापरून गट करत असल्याने आता शिवसेना थेट निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.
बंडखोरांना परत घेऊ नका अशी मागणीही कार्यकारणीत करण्यात आली. शिंदे गटाविरोधात शिवसेना सगळ्या बाजूंनी लढताना दिसत आहे. 16 आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे आता निवडणूक आयोगाकडेही जाणार आहे.
शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहेत. तसा ठराव कार्यकारणीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडला होता.
शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना असा गट केल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाला योग्य वेळी योग्य जागा दाखवून देण्यात येईल. दगा देणाऱ्यांना, गद्दारांविरोधात शिवसेना खमकी उभी राहणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.