Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना (Shivsena) अॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येतंय. आज मुंबईत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (Shivsena) मेळावा घेतला. या मेळाव्यातून संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
दहिसरमध्ये झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. गुलाबराव पाटलांची भाषण पाहिली तर असं वाटत होता शिवसेनेत हा एकच वाघ उरला आहे, आता ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी आमदार संदीपान भूमरे यांच्यावरही निशाणा साधला. संदीपान भुमरे हा पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. मोरेश्वर सावेंचं तिकिट कापून याला तिकिट दिलं. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असं डोळ्यात अश्रू आणत उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर म्हटलं, पण हे अश्रू मगरीचे होते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल हे बिग बॉसचं घर वाटतं, या आमदारांना आज ना उद्या मुंबईत यावंच लागणार आहे. हे जे 40 जण तिथे आहेत ती प्रेतं आहेत. जेव्हा ते इथे परत येतील तेव्हा त्यांचं फक्त त्यांचं शरीर येईल त्यांचा आत्मा आणि मन मेलेलं असेल, बंडखोरांनी इथं येऊन दाखवावं असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
आपण आज जे आहोत ते शिवसेनेमुळे आहोत. आम्ही खासदार झालो, राष्ट्रीय नेते झालो, आज मोदी आणि शहा हेदेखील आम्हाला बघून रस्ता बदलतात, कारण त्यांना माहीत आहे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, यांच्या नादी कोणी लागत नाही' असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांवर टीका
आता किरीट सोमय्या काय करणार असं सांगत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची नक्कल केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार झालेत. प्रता सरानाईकला तुरुंगात पाठवणार असं बोलतो होते, आता सोमय्या काय करणार. अशी कुठली वॉशिंग मशीन आहे त्यात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची केस साफ झाली. माझ्यावर ईडीची कारवाई झाली, घर आणि मालमत्ता जप्त झाली पण मी गुडघे टेकले नाहीत असं संजय रऊत यांनी म्हटलं आहे.