दिनशे दुखंडे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबर ही निवडणूक होणार आहे. अशात नारायण राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने गेम प्लान आखल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय होणार की पराभव याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
त्यामुळे नारायण राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची व्युहरचना आखली असल्याचे समजते. शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची एका दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्यापेक्षा NCP ने लढवावी. NCP ने ही निवडणूक लढवल्यास राणेंच्या पराभवासाठी काँग्रेस आणि शिवसेना सहकार्य करेल.
नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानपरिषदेची एक जागा रिकामी झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा निवडणुकीत विजय मिळवणे चांगलेच कठिण जाणार असे चित्र दिसत आहे. मात्र भाजपप्रणीत NDA चे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145चा आकडा गाठता येत नाही.
तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर एकूण आकडा 146 म्हणजे बहुमतापेक्षा जास्त होतो. पण नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांची मतं काँग्रेसच्या गोटात जाणार नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रपती निवडणूकीच्या वेळी भाजपला महाराष्ट्र विधानसभेतल्याच काही अदृश्य हातांनी मदत केली होती...त्यामुळे आता राणेंच्या निवडणूकीत कोणाचे अदृश्य हात मदतीला येतात हे बघणं औत्सुक्याचं आहे.
शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणेविरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नाही असं सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत. राणेंना पुन्हा विधानपरिषदेवर यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं शक्य केवळ अशक्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचं राजकारण अटळ असल्याचं स्पष्ट दिसंतय.