सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको- उद्धव ठाकरे

या लेखातून शिवसेनेने कुठेतरी अप्रत्यक्षपणे गुजरातवरही टीका केली.

Updated: Aug 11, 2018, 07:44 AM IST
सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको- उद्धव ठाकरे title=

मुंबई: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा दाखला देत शिवसेनेने भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, अशी सणसणीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. 

गेल्या चार वर्षांमध्ये काश्मीर प्रश्नाचा पार विचका झाला आहे. देशातील सर्व विरोधकांना धाराशायी केल्याचा आनंद मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो, पण पाकिस्तानला धाराशायी केल्याचा आनंद हा देश कधी साजरा करणार? तो आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठीच जनतेने तुम्हाला सिंहासनावर बसवले आहे, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. 

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मृत्यूनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वाढदिवस साजरा केला होता. यावरुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको, असे सांगत सेनेने भाजपला लक्ष्य केले.

याशिवाय, या लेखातून शिवसेनेने कुठेतरी अप्रत्यक्षपणे गुजरातवरही टीका केली. मेजर कौस्तुभ राणे, कर्नल महाडिक यांच्यासह शेकडो मराठी जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. देशाचे संरक्षण करणे हाच महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. इतर ‘तागडी’बाज राज्ये फक्त नोटा मोजण्यात व उधळण्यात मग्न असताना शिवरायांचा महाराष्ट्र सीमेवर लढतो व हौतात्म्य पत्करतो. म्हणूनच राष्ट्रीय प्रश्नांवर मत व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध हक्क आम्हाला प्राप्त झाला आहे, असे शिवसेनेने सांगितले आहे.