मुंबई: पी. चिदंबरम यांनी गृहमंत्री असताना हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा बागुलबुवा उभा केला होता. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि प्रज्ञासिंह ठाकूर हे त्यांच्या विकृत कल्पनेचा बळी ठरले होते. मात्र, आज हेच लोक दिल्लीचे सूत्रधार आहेत, तर चिदंबरम सीबीआयच्या कोठडीत आहेत. हा प्रकार म्हणजे काळाने घेतलेला सूड म्हणावा लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री सीबीआयने ताब्यात घेतले होते. यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. याविरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार सुडाचे राजकारण खेळत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चिदंबरम यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. आयएनएक्स व एअरसेल व्यवहार म्हणजे मिठाचा सत्याग्रह किंवा दांडीयात्रा नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही. त्यामुळे या प्रकरणास नैतिकता आणि लोकशाही मूल्यांचा मुलामा देण्याजी गरज नाही.
चिदंबरम यांनीही गृहमंत्री असताना सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. हिंदू दहशतावद या शब्दाचेही जनक तेच होते. त्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि साध्वी प्रज्ञा चिदंबरम यांच्या विकृत राजकारणाचा बळी ठरले होते. मात्र, आज हेच लोक दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूरही संसदेत पोहोचल्या. चिदंबरम यांची रवानगी मात्र सीबीआयच्या कोठडीत झाली. हा काळाने घेतलेला सूड आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
तपासयंत्रणांकडे चिदंबरम यांच्याविरोधात ठोस पुरावे नाहीत- काँग्रेस
याशिवाय, शिवसेनेने सीबीआयच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारल्यानंतर ७२ तास ते पोलीस किंवा तपासयंत्रणांच्या हाती लागले नाहीत. मग या यंत्रणा गुन्हेगार किंवा अतिरेक्यांचा शोध कसा घेणार, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.