मुंबई : Chhagan Bhujbal On Shiv Sena : शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने शिवसेना संपणार असे बोलले जात आहे. तसेच शिल्लक सेना असेही हिणवले गेले. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना तळागाळात गावागावात पोहोचली आहे. त्यामुळे शिवसेना कधीही संपणार नाही, असे विधान भुजबळ यांनी केले. ते सध्याच्या शिवसेनेतील फुटीनंतर ते बोलत होते. त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतले. त्यांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार टीका केली. 'बाळासाहेबांची शिवसेना' याची त्यांनी खिल्ली उडवली. शिंदे गटाला यापुढील काळात बाळासाहेबांची शिवसेना गट म्हणून ओळखले जाईल. मात्र, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांची नाही. ही शिवसेना कोणाची, असाच थेट सवाल उपस्थित केला. बाळासाहेब थोरात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांची सेना असा सवाल केलाय.
पूर्वी निवडणूक चिन्ह पोहोचवणे फार अवघड होते. शिक्षण कमी होतं. लोकांनंपर्यंत पोहोण्याची माध्यमं तेवढी नव्हती, पण आज तसं चित्र नाही. काल अवघ्या अर्ध्या तासातच 'मशाल' हे चिन्ह सगळ्या ठिकाणी पोहोचले आहे. शिवसेना कधीही संपणार नाही. उलट आता ती अधिक जोमाने वाढेल. त्यांना 'मशाल' हे चिन्हं मिळाले आहे. जरी धनुष्यबाण गोठवले तरी आता हे चिन्ह पोहोचण्यास कितीसा वेळ लागणार आहे. शिवसेना तळागाळात गावागावात पोहचली आहे. कालच ते महाराष्ट्रात पोहोचले आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहील. मात्र, शिवसेनेमध्ये असा वाद होणे क्लेशदायक आहे, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेची स्थापना जरी 1966 साली झाली असली तरी 1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. गेली 33 वर्षे धनुष्यबाण शिवसेनेची ओळख होती. 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या. आता उद्धव ठाकरे यांना नव्या चिन्हानं निवडणूक लढवावी लागणार आहे.