आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनेचे स्वप्न इतक्यात पूर्ण होणार नाही - आठवले

'शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठीचा आग्रह सोडावा'

Updated: Nov 2, 2019, 02:42 PM IST
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनेचे स्वप्न इतक्यात पूर्ण होणार नाही - आठवले title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी ती फेटाळून लावली आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठीचा आग्रह सोडण्याचा सल्ला दिला आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत शिवसेनेचं मत साध्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

आदित्य ठाकरे यांना अनुभव कमी आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहू नये. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तोडण्याची भूमिका करण्यापेक्षा जोडण्याची भूमिका घ्यावी असंही ते म्हणाले.

शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं. भाजपच्या ऑफर स्वीकारून शिवसेनेने सत्तेत यावं. तसंच, शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले. 

१९९५ मध्ये शिवसेनेच्या जागा जास्त होत्या, त्यावेळी जागा जास्त म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला. अडीच वर्षांच्या संबधी देशात कोणत्याही राज्यात करार नाही. शिवसेनेकडे आधी १३ मंत्री होते आता १६ मंत्रिपद शिवसेनेला देण्यात येत आहे. राष्ट्रपती राजवट ही सरकार न झाल्यास, कायद्यानुसार होऊ शकत असल्याचं ते म्हणाले.

  

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. रामदास आठवले यांनी, ओल्या दुष्काळाबाबत आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.