शरद पवारांचे 'पर्व' संपले म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचा टोला

तोडफोडीच्या राजकारणामुळे सध्या अनेक पक्ष तरारत आहेत.

Updated: Sep 23, 2019, 08:26 AM IST
शरद पवारांचे 'पर्व' संपले म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचा टोला title=
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचा मूळ स्वभाव पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अलीकडच्या अग्रलेखातून याचा वारंवार प्रत्यय येताना दिसत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात घरघर लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शरद पवार यांचे पर्व संपल्याचे वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा 'सामना'तील अग्रलेखातून समाचार घेताना शिवसेनेने अप्रत्यक्षपणे शरद पवार यांची पाठराखण केली आहे. 
 
या अग्रलेखात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शरद पवारांचे पर्व महाराष्ट्रातून संपले आहे. इथे पर्व हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच पर्व असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व 'माजी' ठरतात, असे शिवसेनेने म्हटले आहे.
 
शरद पवार यांनी तोडफीडीचे राजकारण केले. त्याची फळे ते भोगत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. पण याच तोडफोडीच्या राजकारणामुळे सध्या अनेक पक्ष तरारत असल्याचे जनता पाहत आहे, असे सांगत शिवसेनेने भाजपमधील मेगाभरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
याशिवाय, अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत, असे जाहीर केल्याने आगामी निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता असल्याची खोचक टिप्पणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. गुंतवणूक, शेती, उद्योग, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेल्याचे प्रमाणपत्र अमित शहा यांनी दिले. तर चंद्रकांत पाटील यांनीही महाराष्ट्रातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीर केले. असा आत्मविश्वास कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता. त्यामुळे आगामी निवडणूक ही केवळ औपचारिकता असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.