आघाडी किंवा युतीची चिंता तुम्ही करु नका! जनतेची कामं करा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना आदेश - सूत्रांची माहिती

Updated: Jul 8, 2021, 04:32 PM IST
आघाडी किंवा युतीची चिंता तुम्ही करु नका! जनतेची कामं करा, उद्धव ठाकरे यांचे आदेश title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. या बैठकीला राज्यातून सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख उपस्थित होते. 

गावा-गावात शिवसेना पोहोचण्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरू करा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसंपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलैदरम्यान पार पडणार आहे. 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखांनी राबवावी तसंच आघाडी किंवा युती होणार का याची चिंता करु नका, तुम्ही फक्त जनतेची काम करा अशा सूचना शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती आहे.  

'माझं गाव, करोना मुक्तं गाव' या मोहिमेतंर्गत प्रत्येक घरातून शाखाप्रमुखांनी जनेतेची माहीती घ्यावी, लसीकरण केलंय की नाही, त्यांच्या इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही. याचीही माहीती घ्या. असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

'तुम्ही आघाडी किंवा युती होणार का? याची चिंता करू नका, तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड-19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं आहे. अशीच चांगली कामं पूढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव करोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालीका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहीजेत.  राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, मी तुमच्या पाठीशी आहे.' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.