शरद पवारांच्या मुलाखतीस कारण की...

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. 

Updated: Jul 11, 2020, 03:49 PM IST
शरद पवारांच्या मुलाखतीस कारण की...

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई:  एकीकडे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं चित्र असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे प्रणेते शरद  पवार यांनीच केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांची ही मुलाखत महाविकास आघाडीचे दुसरे प्रणेते संजय राऊत यांनी घेतली असून त्याचं टायमिंगही लक्षात घ्यायला हवं.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. सुरुवातीला काँग्रेसने तक्रारीचा सूर लावला. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही, काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय परस्पर घेतले जातात, अशी तक्रार काँग्रेसने लावली. खरं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यातही अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याची तक्रार मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळ बैठकीतच केली होती. मात्र काँग्रेसची नाराजी जास्त होती, कारण काँग्रेस सरकारमध्ये असूनही निर्णय प्रक्रियेत नव्हती. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाण त्यांच्या कानी घातलं.

शिवसेनेमुळे भाजपला १०५ आकडा, अन्यथा ५० च्या घरात जागा - शरद पवार

काँग्रेसची ही तक्रार ताजी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्षही वाढू लागला. मुंबईत लॉकडाऊन कडक करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख अंधारात होते, तर पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दणका दिला. हे  प्रकरण शांत करण्यासाठी थेट शरद पवार आणि अनिल देशमुखांना मातोश्री गाठावी लागली होती. या सगळ्यावर भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत, हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल अशी विधानं देवेंद्र फडणवीस करत आहेत.

महाविकास आघाडीतील चव्हाट्यावर येणाऱ्या या मतभेदांमुळे सहाजिकच संजय राऊत अस्वस्थ असणार, कारण महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. त्यामुळे हे मतभेद दूर व्हावेत आणि या वादावर पडदा पडावा, तसंच महाविकास आघाडी भाजपविरोधात भक्कम आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला. 

महाविकास आघाडीत शरद पवार आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची होती. जशी आघाडी एकत्र आणली तशी ती टिकवण्यासाठीही या दोन्ही नेत्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत होणं, या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करणं, महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं सांगणं यालाही एक वेगळं महत्त्व आणि कारण आहे.