शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार; अरविंद सावंत राजीनामा देण्याच्या तयारीत

शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

Updated: Nov 10, 2019, 09:54 PM IST
शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार; अरविंद सावंत राजीनामा देण्याच्या तयारीत title=

मुंबई: भाजपने सत्तास्थापन करायला नकार दिल्यानंतर मुंबईतील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीवेळापूर्वीच शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली होती. यासाठी शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांना भेटावे लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या चर्चेनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असे सांगितले जाते.

त्यासाठी शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. अरविंद सावंत हे सध्या अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही क्षणी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजपने केंद्रात केवळ एक मंत्रिपद दिले होते. शिवसेनेने या पदासाठी अरविंद सावंत यांना संधी दिली होती. 

शिवसेनेनं एनडीएसोबत नातं तोडावं, पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीची अट

तर दुसरीकडे मातोश्रीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. थोड्याचवेळात मातोश्रीवर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काहीवेळापूर्वी द रिट्रिट हॉटेलमध्ये असणारे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यपालांसमोर बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कसे सादर करायचे, याविषयी बैठकीत खल होण्याची शक्यता आहे.

...मग भाजपने इतका अट्टाहास कशासाठी केला- संजय राऊत

इतके दिवस केवळ पडद्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेला प्रत्यक्षात हे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही कुंपणावर बसून असलेल्या काँग्रेसशी वेगाने वाटाघाटी करून त्यांना पाठिंब्या देण्यासाठी राजी करणे, शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.