मुंबई : राज्यातील सर्व दुकानांवर यापुढे ठळक अक्षरात मराठी पाट्या लावणं बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या निर्णयावरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू झालं आहे. काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर यावरून शिवसेना-मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. (shivsena mp sanjay raut warn to traders over to marathi name plate of shops)
राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक ठळकपणे मराठी भाषेत असावेत असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यावरून पुन्हा एकदा राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. तर निवडणूका समोर दिसताच असे मुद्दे आठवतात का? असा सवाल MIM खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
दुसरीकडं मराठी पाट्यांच्या मुद्यावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरू नका अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना दम भरला आहे.
दरम्यान, मराठी पाट्यांच्या निर्णयावरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच, राज ठाकरेंनी यासाठी मनसैनिकांनी दिलेल्या लढ्याची आठवण एका पत्राद्वारे करून दिली आहे.
मराठी पाट्यांसाठी माझ्या महाराष्ट्र मनसैनिकांनी आंदोलनं केली. त्याचं सारं श्रेय महाराष्ट्र सैनिकांना जातं. त्यांचं श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करू नये. बाकी निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. आता कच खाऊ नका, निर्णयाची अंमलबजावणी करा, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय.
मराठी भाषेशिवाय नामफलकावर इतर भाषेची गरजच काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये दुकानांच्या पाट्या त्या त्या प्रादेशिक भाषेत लिहिणं बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रात नियमातल्या त्रुटींमुळे मराठी पाट्यांच्या सक्तीची अंमलबजावणी करता येत नव्हती.
उशिरा का होईना, मराठीच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आता महाराष्ट्रात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मराठी भाषेचा आदर राखून, पाट्या ठळक मराठी भाषेत लावून निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी.