भाजप हे काँग्रेसवाल्यांचे हक्काचे पाळणाघर व्हायला नको- उद्धव ठाकरे

भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल.

Updated: Mar 14, 2019, 07:30 AM IST
भाजप हे काँग्रेसवाल्यांचे हक्काचे पाळणाघर व्हायला नको- उद्धव ठाकरे title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये सामील होण्यासाठी आयारामांची मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला एक सूचनावजा सल्ला दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे? भविष्यात भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत, अशी भूमिका 'सामना'तील अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सुजय आणि भाजपच्या नेत्यांकडून परस्परांचे कौतुक करण्यात आले. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नाराज भाजपच्या दारात रांगा लावून उभे आहेत. हीच बाब शिवसेनेला खटकली असून पक्षविस्तार किंवा जिंकण्यासाठी अशाप्रकारे आयारामांना प्राधान्य देण्याच्या भाजपच्या भूमिकेवर सेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

सुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देतो. तुम्ही आलात, आनंद आहे. मात्र, त्यामध्ये एक धोका आहे. निवडणुकीच्या तोंडावर विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल. परिणामी भविष्यात भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा, असा मित्रत्वाचा सल्ला सेनेने भाजपला दिला आहे.

विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं राधाकृष्ण विखे-पाटलांकडून स्पष्ट