मुंबई : मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी 15 ऑगस्टपासून लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा दिली खरी मात्र त्यासाठी लागणारे क्यूआर कोड, पास तपासणीची यंत्रणा रेल्वेकडे नसल्यानं राज्य सरकारनंच ती उभारावी असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटलं आहे. निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला हवी होती असा टोला दानवेंनी लगावलाय.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून ही सेवा कशी सुरळीत करता येईल आणि जनतेच्या अडचणी कमीतकमी कशा करता येतील, यावर चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तसंच प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचं काम रेल्वेचं नाही तर राज्य सरकारने एन्ट्री पॉईंटला करावं, मुंबईतल्या जनतेसाठी रेल्वे सुसज्ज आहे, आम्ही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, असंही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे,
याला उत्तर देताना 'रेल्वे ही राष्ट्राची आहे एका पक्षाची नाही' अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. मुंबईत ताबडतोब रेल्वे सुरु करावी यासंदर्भात त्यांच्याच पक्षाने आंदोलन केलं होतं, आणि आम्ही ताबडतोब रेल्वे सुरु केलेली आहे, 15 ऑगस्टपासून रेल्वे सुरु होणार आहे, त्याआधी रेल्वे मंत्रालया माहिती दिली जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारनं निर्णय घ्यावा, आम्ही पाठीशी आहोत. केंद्र सरकार लगेचच पुढील कार्यवाही करेल, असं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताच त्यांची भाषा बदलली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.