महाराष्ट्रात राणा विरुद्ध शिवसेना, लेह लडाखमध्ये हम साथ साथ है...?

हे फोटो पाहून राणांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या सामान्य शिवसैनिकांना काय वाटत असेल?

Updated: May 19, 2022, 06:25 PM IST
महाराष्ट्रात राणा विरुद्ध शिवसेना, लेह लडाखमध्ये हम साथ साथ है...? title=

ShivSena vs Rana : महाराष्ट्रातले एकमेकांचे कट्टर हाडवैरी. राणा दाम्पत्य आणि संजय राऊत. गेल्या काही दिवसात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे बाण सोडून त्यांनी महाराष्ट्रातलं वातावरणं प्रचंड तापवलं. 

पण आता लडाखच्या थंड हवेत ते एकत्र फिरतायत. त्या तिघांनी एकत्र जेवणही घेतलं. संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत. नवनीत राणांचे आमदार पती रवी राणा देखील त्यांच्यासोबत आहेत.  त्यांचे फोटो पाहिल्यावर आग लगाके बस्ती में, हम अपनी मस्ती में... असं म्हणण्याची वेळ आली आहे.

राणा विरुद्ध शिवसेना
हनुमान चालिसावरून खासदार नवनीत राणांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज दिलं होतं. त्यांना 'मातोश्री'वर येण्यापासून रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले.  याप्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. तब्बल 13 दिवसांच्या तुरुंगवासानंतर राणा दाम्पत्य जामिनावर सुटलं.

राणा विरुद्ध शिवसेना हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. तर नवनीत राणा आणि संजय राऊतांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. 

राणा विरुद्ध राऊत
संजय राऊतांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणांनी केला.  याप्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली. तर नवनीत राणांनी दाऊद गँगशी संबंधित युसूफ लकडावालाकडून पैसे घेतले, असा आरोप राऊतांनी केला होता.

एवढं टोकाचं राजकारण होऊनही संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लेह लडाखमध्ये एकत्र फिरत आहेत. महाराष्ट्र तापवणाऱ्या नेत्यांनी हिमालयाच्या कुशीत आपल्या तलवारी म्यान केल्या. राणा विरुद्ध शिवसेना वाद खरंच निवळलाय? की महाराष्ट्रातील राजकारण्यांचा हा सुसंस्कृतपणा म्हणायचा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फोटो पाहून राणांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या सामान्य शिवसैनिकांना काय वाटत असेल, हा देखील मोठा सवालच आहे...