मुंबई : फोनला लागलेले हे कान अनेकदा निरुपद्रवी असतात, तर काही प्रकरणांमध्ये ते तुमचं नुकसानही करू शकतात. खास करून तुमच्या मागे कुणी एखादा गुप्तहेर लावला असेल, तर सीडीआरचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता अधिक ! खासगी गुप्तहेर ही संकल्पना नवी नाही. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी राजे-महाराजांच्या काळातही खासगी गुप्तहेर होतेच. फोन नव्हते तेव्हा व्यक्तिगत पाठलाग, पत्र फोडून वाचणं अशा गोष्टींमधून खासगी माहिती काढली जायची. फोन आल्यानंतर अनधिकृतरित्या फोन टॅब करणं शक्य असल्यामुळे गुप्तहेरांचं काम थोडं सोपं झालं.
आता तर मोबाईलचा जमाना आहे. संभाषण जितकं सोपं झालंय, तितकंच या संभाषणाची चोरीही सोपी झाली आहे. राज्यातल्या सीडीआर प्रकरणात पहिल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक झाल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
आता रजनी पंडित यांना जामीन मिळाला असला, तरी यामुळे गुप्तहेरांकडून चुकीच्या मार्गानं लोकांची खासगी माहिती चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. अर्थात, जो सीडीआर काढला गेला, त्याचा वापर देशविघातक गोष्टींसाठी केला गेला की कौटुंबिक कारणांसाठी, हे पाहणंही महत्त्वाचं असल्याचं पंडित यांना वाटतं.
आपला सीडीआरपेक्षा व्यक्तिगत पाठलाग, प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्यावर विश्वास असल्याचा दावाही पंडित यांनी केला आहे.
पंडित म्हणतात, तसा या प्रकरणात देशविघातक कारवायांसाठी वापर झाला नसेलही. पण असा वापर होतच नसेल, याची खात्री कोण देणार ? पंडितांसारखे शेकडो खासगी गुप्तहेर देशभरात आहेत आणि त्यांचे लाखो ग्राहक असतील... त्यामुळे अशा पद्धतीनं चोरीच्या मार्गानं माहिती काढणं अयोग्यच..