मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : फादर्स डेच्या दिवशी एक मोठी घटनाचा उलगडा झाला आहे. जेवणाच्या कारणावरून आईला मारहाण करत असलेल्या 52 वर्षीय वडिलांची मुलाने हत्या केल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवून अशोक शिवशरण याला अटक केली आहे. पवईच्या महात्मा फुले नगर आयआयटी परिसरात शिवशरण कुटुंब वास्तव्याला आहे. चिदानंद शिवशरण हे दररोज दारू पिऊन घरी पत्नीला मारहाण करत असत.
12 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत चिदानंद शिवकरण हे पत्नीला जेवणावरून शिवीगाळ करत मारहाण करण्यास धावले. यावेळी आईवर धावून गेलेल्या वडिलांना मुलगा अशोकने पकडून मारहाण केली. या मारहाणीनंतर अशोक हे झोपले. मात्र मारहाणीत लागलेल्या मुक्कामाराने अंतस्राव झाल्याने चिंदानंद शिवकरण यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय चिदानंद यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर चिदानंद यांच्या पत्नी आणि मुलाने डॉक्टरांना बोलावले.
डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. हा मृत्यू प्रथमदर्शी नैसर्गिक असल्याचे सर्वांना वाटले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यात मारहाणीत चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पार्कसाईट पोलिसींनी हत्येचा गुन्हा दाखल करत अशोकला अटक केली आहे.