बोला फडणवीस बोला... अंडरवर्ल्ड कनेक्शनचं काय? राऊतांचा थेट सवाल

राणा दाम्पत्य यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे प्रकरण संजय राऊत यांनी उघड केले. मात्र, या प्रकारावरून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलाय. 

Updated: Apr 27, 2022, 11:46 AM IST
बोला फडणवीस बोला... अंडरवर्ल्ड कनेक्शनचं काय? राऊतांचा थेट सवाल title=

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी 'डी' गँगचा फायनान्सर लकडावाला यांच्याकडून कर्ज घेतले. गेल्या 15 दिवसांत जे घडतंय त्यामागे 'डी' गँगचा पैसा लागलाय. राणा दाम्पत्य यांचे 'डी' गँगसोबत संबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आलाय. हा तपासाचा भाग असूनही ईडी याचा तपास का करत नाही? असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.

राणा दाम्पत्य यांचे 'डी' गँगसोबत संबंध असल्याचं समोर येतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी करता मग यांची का नाही? ही सरळ सरळ मनी लाँड्रींगची केस आहे. आता ईओडब्ल्यू नक्की चौकशी करेल असे त्यांनी म्हटलं.

ईडीने आमची मालमत्ता जप्त केली, चौकशी केली. अनिल देशमुख, नवाब  मलिक यांना अटक केलं. मग राणांना अद्याप का वाचवंल गेलं? याच्या मागे कोण आहे? कोणती आंतरराष्टीय शक्ती आहे? असे सवाल त्यांनी केले.

नवनीत राणा यांनी ८० लाख जमा केले त्याची चौकशी का झाली नाही? पण आमची मात्र, ५ लाख, १० लाख, २० लाखांसाठी चौकशी झाली. त्या राणा यांना ईडी कधी चहा पाजणार? आता ईडी या प्रकरणाची चौकशी करणार का, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात? नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर हे भाजपचे नेते पोपटासारखे बोलत होते. तेच फडणवीस आता गप्प का आहेत? बोला, फडणवीस बोला जे वातावरण बिघडवून देश तोडू पाहत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही आहात का? असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीस यांना केला.

आता थातुरमातुर उत्तर न देता या राणा दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनीही केली पाहिजे. पण, विरोधी पक्षात इतके सोंगाडे भरलेत की, प्रत्येकावर एक स्वतंत्र सिनेमा निघेल, अशी टीका त्यांनी केली.