गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या (BMC) उपहारगृहातून (canteen) गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत असा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात पण खावून झाल्यानंतर ही भांडी उपहारगृहाला परतच करत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
भांडी बाहेर घेऊन जाऊ नका!
कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे ही भांडी मागितल्यास त्यांच्याकडून मात्र आपण घरातूनच ती आणल्याचे सांगितले जात आहे. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी मुंबईच्या महापालिकेच्या कॅन्टीनबाहेर सूचना फलक लावण्यात आला आहे. उपहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका! अशी सूचना या फलकावर लिहिण्यात आली आहे.
पालिकेतील काही कर्मचारी अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात आणि ती परत केली जात नाहीत. त्यामुळे वर्षभरात कॅन्टीनमधून हजारो भांडी गायब झाली असून 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
काय लिहीलंय फलकावर?
"सिद्धीविनायक कॅटर्स, मनपा उपहारगृह. मुख्यालयातील अधिकारी आणि कामगार बंधुनों आपणास विनंती करतो की, उपहारगृहातील प्लेट, चमचे, ग्लास, डिश इत्यादी सामान कामगार व अधिकारी बाहेर घेऊन जातात. त्यामुळे उपहार गृहातील कामगारांची या बाबतीत गैरसोय होत आहे. तरी उपहार गृहातील प्लेट, चमचे, ग्लास, डिश बाहेर घेऊन जावू नये ही नम्र विनंती," असे कॅन्टीनबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर लिहीण्यात आले आहे.
एवढी भांडी झाली गायब
चमचे - 6 ते 7 हजार
लंच प्लेट - 150 ते 200
नाश्ता प्लेट - 300 ते 400
ग्लास - 100 ते 150
दरम्यान, भांडी चोरु नका आणि चोरलेली परत करा असे आवाहन करणारा फलक देखील महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये लावण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने भांड्यांची चोरी झाल्यामुळे कॅन्टीन चालकाचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कॅन्टीन चालकाचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे वैतागलेल्या कॅन्टीन चालकाने आता थेट फलक लिहून भांडी घेऊन न जाण्याचे आवाहन केले आहे.