मुंबई : संपकर कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळानं आक्रमक पवित्रा घेतलाय. निलंबित कर्मचारी कामावर परत यायला तयार असतील तरी त्यांना घेतलं जाणार नाही अशी माहिती महामंडळाचे एमडी शेखर चन्ने यांनी दिली आहे. इतर कर्मचा-यांना कामावर यायचं असेल तर ते कामावर येऊ शकता. तांत्रिक विभागाचा स्टाफ कामावर आल्याचंही चन्नें यांनी सांगितलं आहे.
संप सुरु असला तरी अनेक कामगारांनी आम्हाला विनंती केली आहे की त्यांना कामावर परत यायचं आहे, ज्या कामगारांचा आम्हाली विनंती येत आहे, त्यांना मदत करुन त्यांना कामावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा संप अधिक न चालवता कामावर रुजू व्हा असं आवाहन चन्ने यांनी केलं आहे.
संप मोडून काढण्यासाठी हालचाली
एसटी कर्मचा-यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्यात... त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतून राज्यभरासाठी एसटी बसगाड्या सोडण्यास सुरूवात झालीय. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुंबई सेंट्रल डेपोतून एसटी बसगाड्या रवाना करण्यात आल्या. राज्यातील 17 डेपोतून तब्बल 36 एसटी बसेस आतापर्यंत सोडण्यात आल्यात. त्यात सुमारे 822 प्रवासी होते.
दरम्यान, जे कर्मचारी कामावर येतील, त्यांना संरक्षण देण्यात येईल. त्यांना अटकाव केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.