दादा कुटुंबात फाटाफूट नको, राजीनामा दे, सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन

भावूक झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना परतण्याची विनंती केली. 

Updated: Nov 24, 2019, 08:22 AM IST
दादा कुटुंबात फाटाफूट नको, राजीनामा दे, सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन title=

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी सकाळी घडलेलं हे राजकीय महानाट्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनपेक्षित, धक्कादायक होतं. अजित पवारांच्या या कृतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटल्या. पवार कुटुंबियांसाठी हे बंड धक्कादायक आणि नात्यांच्या बंधांवर प्रहार करणारं होतं. यामुळे भावूक झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना परतण्याची विनंती केली. 

दादा...कुटुंबात फाटाफूट नको, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे...असं भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. अजित पवारांच्या धक्कादायक राजकीय भूमिकेवर बहिण सुप्रिया यांचे शब्द नात्याच्या बंधांवर नेमकेपणानं बोट ठेवतात.

'आपल्या पवार कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास राज्यातील जनतेला माहित आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको.
दादा....तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये.'

कोणाला कानोकान खबर न लागू देता, अजित पवारांनी उचलेल्या पाऊलामुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारीही अचंबित झाले. सुप्रिया सुळे यांनी या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर सूचक आणि तितकंच बोलकं असं व्हॉट्स अप स्टेट्स ठेवलं.

'तुम्ही जीवनात कोणावर विश्वास ठेवता?, आयुष्यात असं फसवल्याची भावना यापूर्वी कधी वाटली नाही. ज्यांना पाठिंबा दिला. प्रेम दिलं, त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काय दिलं.?'

सध्याच्या स्थितीवर हे स्टेट्स बरच काही बोलून जातंय. आम्हा पवार कुटुंबात माझ्या आईचा शब्द अंतिम होता. आता माझा असतो, असं शरद पवारांनी निवडणुकी दरम्यान अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्यावर बोलताना म्हंटलं होतं. पवार काका-पुतण्याच्या नात्यावर अनेकदा बोलंल गेलंय. लिहिलं गेलंय. शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण ? अजित पवार की सुप्रिया सुळे यावर नेहमीचं चर्चा होत असते. आक्रमक स्वभावाच्या अजित पवारांच्या नाराजीच्या मुळाशी हे एक तर कारण नाही ना? यावर मंथन होत असतं. आता सुप्रिया यांच्या भावनिक आवाहनाला स्पष्टवक्ते आणि आक्रमक अजितदादा प्रतिसाद देतात का? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.