मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं आहे. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे, पण सीबीआय चौकशीला माझा विरोध नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
'मुंबई पोलिसांना मी गेली ५० वर्षे ओळखतो, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी काय आरोप केले, यात मी खोलात जाणार नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर नक्कीच दु:ख होत. पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते. सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मला याबद्दल विचारलं. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटलं. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी त्याची नोंद घेतली जात नाही,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
शरद पवार आणि संजय राऊत यांची आज भेट झाली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली, तर पुढे काय करायचं? याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय, पण शरद पवार यांनी मात्र अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत आणि मी नेहमीच भेटतो, असं पवार म्हणाले.