मुंबई : तेजपर्व दिवाळीला आजपासून सुरूवात झालीय. पंचांगानुसार वसुबारसनं दिवाळीला सुरूवात झाली. गाय आणि वासराच्या पूजेचं महत्त्व असलेला वसुबारस हा दिवाळीतला पहिला दिवस. या दिवशी गायीची वासरासह पूजा करतात.
घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनंही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याघरी गाय, वासरं आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातली महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. गायीला वस्त्र अर्पण करतात. शिंगं आणि खुरांना हळद-कुंकू, फुलं, अक्षता वाहून, गायीचं आणि वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो. गोशाळांमार्फतही वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते.
दरम्यान, मुंबईत दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आकाशकंदील, रोषणाई, पणत्या, तोरण, रांगोळी, सजावटीचे साहित्य या सगळ्याची जोरदार खरेदी होतेय. मुंबईच्या बाजारात सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देण्यात येत आहे.