आताची सर्वात मोठी बातमी! किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी केली चौकशी

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ, या प्रकरणात चौकशी

Updated: Oct 28, 2022, 09:18 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी केली चौकशी title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी (Dadar Police) किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. एसआरए घोटाळयासंदर्भात (SRA Scam) ही चौकशी झाल्याचं कळतंय. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी उद्या पुन्हा किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.

दादर पोलीस ठाण्यात एसआरए घोटाळा प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणीच किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली. किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्धल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता SRA मध्ये 6 गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली  की या सदनिकांचा ताबा घ्यावा, असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

काय होता किरीट सोमय्यांचा आरोप?
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वरळी इथल्या गोमाता जनात SRA मध्ये काही गाळे हडप केले तर काही गाळे बेनामी हस्तगत केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच किशोरी पेडणेकर यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचं रहिवाशी ठिकाण वरळी गोमाता जनात एसआरएच्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता. 

एसआरएची गोमाता जनता एसआरएमध्ये जे लाभार्थी होते त्यात लोकांच्या यादीत पेडणेकर परिवाराचं नाव नाही. लाभार्थी नसतानाही किशोरी पेडणेकर यांनी अश्या प्रकारे असे अनेक गाळे आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.