CORONA UPDATE : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरून सुमारे दीड हजारांपर्यंत खाली आला आहे

Updated: Oct 21, 2021, 10:30 PM IST
CORONA UPDATE : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?

मुंबई : मुंबईसह राज्य आता कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत आहे. मर्यादित प्रमाणात कोरोना दीर्घकाळ राहण्याच्या स्थितीत म्हणजेच अंतर्जन्य दिशेने जात असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. म्हणजेच कोरोना धोक्याच्या पातळीवरून आता नियंत्रणात येत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबईत सध्या जवळपास सर्वच भागांमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झालं आहे. 60 ते 70 टक्के समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. राज्यात सुमारे 70 टक्के नागरिकांना लशीची पहिली तर सुमारे 30 टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. मृतांमध्येही दीर्घकालीन आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाच प्रामुख्याने समावेश आहे. 

महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे? 

राज्यात ऑगस्टमध्ये दररोज सुमारे पाच ते सहा हजार रुग्ण आढळत होते. सप्टेंबरपासून यात घसरण होत दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे साडेतीन हजारापर्यंत खाली आली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरून सुमारे दीड हजारांपर्यंत खाली आला.

बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नाही. ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या सात उपनगरांमध्येही एकही मृत्युची नोंद नाही. तर अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. 

कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे आजही तितकेच गरजेचे आहे.