मुंबई : मुंबईकरांना घराबाहेर पडल्यावर आज सुखद धक्का बसला आहे. कारण सकाळी वाढत्या गर्मीमुळे घामाच्या धारा न वाहता चक्क वातावरण थंड झाले आहे. वातावरणात धुरकं पाहायला मिळाले. मुंबईतील वातावरणामध्ये चांगलाच बदल झालेला पाहायला मिळाला. हवेत गारवा निर्माण झाला आहे. उंच इमारतीच्या वरील काही भाग धुक्याने आच्छादित झाला होता. मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारचे धुकं दिसणे एक वेगळी बाब आहे हे नेमकं धुक आहे की प्रदूषण की आणखी काही हे तपासणे गरजेचे आहे.
मार्च महिना संपत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळीही उन्हाच्या झळा जाणवत आहेत. मुंबईच्या तापमानाने चाळीशीही ओलांडली आहे. घामाच्या धारांनी नागरिक हैराण होत असतानाच आज झालेल्या हवामानातील बदलाने काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा मिळाला. वातावरणात गारवा निर्माण झाला असून यामुळे उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काही भागात मळभही पाहण्यात येत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी हवेतील धुरकं हे प्रदूषण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाच्या झळा सुरू झालेल्या असताना वातावरणातील हा बदल त्रासदायकही ठरत आहे. उन्हापासून बचाव होण्यासाठी खाण्यापिण्याच्या तसेच काही सवयींमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.