मुंबई: मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा आरक्षण कायदा वैध ठरवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही सांगितले.
तसेच मराठा कार्यकर्त्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले. यापूर्वी सदावर्ते यांच्यावर न्यायालयाच्या आवारात हल्लाही झाला होता. यानंतर त्यांना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अॅड. सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. जाधव नावाचे एक पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडूनही ते मराठा असल्याने मला धोका असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या. आरक्षणविरोधी जनहित याचिकादार जयश्री पाटील यांची बाजू ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर मांडली होती.
मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यासाठी सरकारने न्यायालयावर दबाव आणला- सदावर्ते
तत्पूर्वी न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध ठरवताना म्हटले की, मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, मूळ मागणीप्रमाणे १६ टक्के आरक्षण देता येणे शक्य होणार नाही. त्याऐवजी मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देता येणे शक्य आहे, असे न्यायालयाने सांगितले. अपवादात्मक परिस्थितीत ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल केला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले.
या निर्णयामुळे आता मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के तर नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.