मुंबई : मुंबै बँकेच्या निवडणूकीत मजूर प्रवर्गातून अर्ज भरणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अर्जावर आक्षेप घेऊन तक्रार दाखल करण्यात आली होती. या अर्जावर सहकार विभागाने निकाल दिला आहे.
प्राप्त तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान विभागाने दरेकर यांना तुम्ही मजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीसही पाठवली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर सहकार विभागाने दरेकर मजूर नाहीत असा अहवाल दिला आहे.
सहकार विभागाच्या या अहवालानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मागील अनेक वर्षांपासून मजूर या संवर्गातून दरेकर यांनी मुंबई जिल्हा बँकेवर संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
परंतु, दरेकर हे मजूर नसल्याचा अहवाल सहकार विभागाने दिला आहे. त्यामुळे दरेकर यांनी फसवणूक करून सदस्यता मिळवल्याचे स्पष्ट होत आहे. सहकार कायद्यानुसार पुढील एक वर्षासाठी ते कोणत्याही प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरत नाहीत.
दरेकर यांनी केलेल्या फसवणुकीप्रकरणी त्यांच्याविरोधात फौजदारी तसेच अन्य उचित कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांना दिली आहे.