'परराज्यातल्या कामगारांसाठी स्पेशल ट्रेनचा विचार करा', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Updated: Apr 21, 2020, 11:32 PM IST
'परराज्यातल्या कामगारांसाठी स्पेशल ट्रेनचा विचार करा', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी title=

मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. लॉकडाऊनच्या या काळात महाराष्ट्रात परराज्यातले जवळपास ६ लाख कामगार आणि मजूर अकडले आहेत. या कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा विचार करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.

परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काही वेळा हे कामगार आणि मजूर आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल, तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

१४ एप्रिलला वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारो कामगार आणि मजुरांची गर्दी जमली होती. रेल्वे सुरू होणार, अशा अफवेमुळे ही गर्दी जमल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. रेल्वेने वेळत स्पेशल ट्रेन सोडल्या असत्या, तर वांद्रे स्टेशनवर झालेली ही घटना टाळता आली असती, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आरोपही केले होते.