धारावीत कोरोनाचा तिसरा बळी

धारावी का बनली आहे कोरोनाचा हॉटस्पॉट?

Updated: Apr 9, 2020, 05:37 PM IST
धारावीत कोरोनाचा तिसरा बळी title=

मुंबई :  मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आणखी एक बळी गेला आहे. धारावीच्या कल्याणवाडीमध्ये एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं धारावीतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.

आठ दिवसांपूर्वी धारावीत कोरोनाचा प्रवेश झाला. एका गारमेंट व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धारावीत कोरोनाचं संकट उभं राहिलं. धारावीत कोरोना शिरकाव होण्यास तबलिगी जमात कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली. दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले काही जण धारावीत येऊन राहिले होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गारमेंट व्यावसायिकानंच त्यांना आश्रय दिला होता, अशी माहिती नंतर समोर आली. धारावीतून हे लोक केरळला गेल्याचं कळतं.

त्यानंतर धारावीतील एका डॉक्टरला, एका नर्सला आणि अन्य काहीजणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं. त्यानंतर आता धारावीत तिसरा बळी गेला आहे. धारावीच्या बलिगानगर आणि सोशल नगर या दोन ठिकाणी आधी दोन बळी गेले होते. आता तिसरा बळी कल्याण वाडीत गेला आहे.

धारावीत आता कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. धारावीला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानलं जातं. लाखो लोक इथं दाटीवाटीनं राहतात. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीला कोरोना हॉटस्पॉट म्हणून पाहिलं जात आहे. महापालिकेनं धारावीमध्ये कठोर उपाययोजना सुरु केल्या आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील करण्यात आले आहेत.

 

धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळले तरी या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत होते. त्यामुळे या भागात कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत होती. या भागाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही धारावीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. तसेच राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्याची मागणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.