...तर विजय मल्ल्याला छगन भुजबळांच्या बराकीत ठेवणार

प्रत्यार्पणानंतर विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्याला आर्थर रोड जेलमधील १२ क्रमांकाच्या बराकीत ठेवले जाण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 2, 2018, 09:49 AM IST
...तर विजय मल्ल्याला छगन भुजबळांच्या बराकीत ठेवणार title=

मुंबई: भारतीय बँकांना तब्बल ९००० कोटींचा चुना लावून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याभोवतीचा कायदेशीर फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याच्या प्रत्यापर्णाची मागणी भारतीय सरकारने केली आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने भारतीय यंत्रणांकडे विजय मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बराकीचा व्हीडिओ मागितला. 

प्रत्यार्पणानंतर विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्याला आर्थर रोड जेलमधील १२ क्रमांकाच्या बराकीत ठेवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी या बराकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अभिनेता संजय दत्त हे वास्तव्याला होते. अनेक हायप्रोफाईल कैद्यांमुळे बराक क्रमांक १२ विशेष प्रसिद्ध आहे. या बराकीची इमारत दुमजली असून प्रत्येक मजल्यावर आठ कारागृहे आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने हायप्रोफाईल कैद्यांना याठिकाणी ठेवण्यात येते.

येथील प्रत्येक तुरुंगात स्वतंत्र शौचालय, न्हाणीघर असून कैद्यांना झोपण्यासाठी उशी आणि गादी उपलब्ध करुन दिली जाते. याशिवाय, प्रत्येक बराकीत एक सिलिंग फॅन आहे. मात्र, कैदी या सिलिंग फॅनला लटकून आत्महत्या करणार नाही, यासाठी हा फॅन उंचावर लावण्यात आला आहे. तसेच बराकीसमोर मोकळी जागाही आहे. कारागृह प्रशासनाच्या या नियमानुसार बराकीतील प्रत्येक कैद्याला दिवसातून चारवेळा खाणे दिले जाते. खाण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि ग्लास प्लॅस्टिकसदृश गोष्टींपासून तयार केलेली असतात. जेणेकरुन त्यांच्या सहाय्याने कैदी स्वत:ला किंवा इतरांना इजा करु शकणार नाहीत.

मात्र, विजय मल्ल्याने या बराकीत राहण्यास नकार दिला आहे. या बरकीत सूर्यप्रकाश आणि खेळती हवा नसल्याची तक्रार मल्ल्याने केली आहे. परंतु, तुरुंग अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या बराकीतील प्रत्येक तुरुंगाला खिडकी आहे. तसेच तुरुंगाच्या गजांमधूनही हवा सातत्याने खेळती राहते. या बरकीत मोकळी जागा असल्याने येथे सूर्यप्रकाशही व्यवस्थितपणे येतो, असे स्पष्टीकरण आर्थर रोड जेल प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.