राज ठाकरेंच्या 'त्या' पत्राचा विषय पोलिसांनी असा संपवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र सैनिकांसाठी एक पत्र लिहिले होते.

Updated: Jun 3, 2022, 01:57 PM IST
राज ठाकरेंच्या 'त्या' पत्राचा विषय पोलिसांनी असा संपवला title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र सैनिकांसाठी एक पत्र लिहिले होते. 

प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा.

माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. 

कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी ते पत्र घराघरात वाटण्याची तयारी केली. मात्र हे पत्र वाटप करणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

घाटकोपरच्या असल्फा विभागात मनसे उपाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी प्रथम या पत्राचे महेश्वर मंदिरात पूजन केले. त्यानंतर हे पत्र घरोघरी वाटप करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चेंबूर येथेही मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरसीएफ पोलीस स्थानकात मनसे कार्यकर्त्याना बसवून ठेवण्यात आले आहे. विना परवाना पत्रक वाटत असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली. 

दादर विभागात मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहीम येथील मकरंद सोसायटीमधील रहिवाश्यांना या पत्रांचे वाटप करत मनसेची भूमिका सांगितली. तसेच, पोलिसांनी कितीही जणांना अटक केली तरी मनसैनिक पोस्टमन बनून राज ठाकरे यांचे हे पत्र घराघरात पोहोचवतीलच असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.