गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे

 पर्यटन कंपन्यांनी सुरु केलं नव्या प्रकारचं पर्यटन 

Updated: Jan 31, 2019, 05:50 PM IST
गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे title=

मुंबई : सध्या मुंबईत एक वेगळ्याच प्रकारचं पर्यटन सुरू झालं आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीत राहून गरिबीचा अनुभव घेण्यासाठी अनेक परदेशी नागरिक उत्सुक असतात. त्यांच्यासाठीच मुंबईत हे गरिबी पर्यटन सुरू करण्यात आलं आहे. धावत्या पळत्या मुंबईचा एक चेहरा असलेल्या धारावीच्या झोपडपट्टी सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं आहे. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दाटीवाटीनं वसलेल्या झोपड्या या मुंबईतल्या गरिबीचा चेहरा आहे. पण धारावीतल्या या गरिबीनं पर्यटन व्यवसायाला श्रीमंत केलं आहे.

परदेशातून आलेले पाहुणे देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीत एकत्र जमले आहेत. कोणी इंग्लंडहून आलं आहे तर कोणी फ्रान्समधून. हा प्रकार म्हणजे झोपडपट्टी पर्यटन. मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत राहण्याचा अनुभव या परदेशी पर्यटकांना घ्यायचा आहे. त्यासाठी पर्यटन कंपन्यांनी हे नव्या प्रकारचं पर्यटन सुरू केलं आहे. ज्यामध्ये मुंबईची गरिबी विकली जाते आहे.

या टूरमध्ये फक्त झोप़डपट्टी दाखवली जात नाही तर परदेशी पाहुण्यांना या झोपडपट्टीत राहण्याचा अनुभवही घेता येतो. झोपडपट्टीत एका रात्रीसाठी राहण्यासाठी तब्बल दोन हजार भरावे लागतात. 

जगातल्या बहुतांश देशांमध्ये गरिबी आहे. पण दुसऱ्याची गरिबी पाहणं कदाचित या परदेशी पाहुण्यांना एक्सायटिंग वाटत असावं. किमान धारावीची गरिबी विकता विकता या परदेशी पाहुण्यांकडून चार पैसे येथील गरिबांना मिळत आहेत. तेवढीच त्यांची चार पैशांची श्रीमंती.