मुंबईत मॉलमधील कोविड सेंटरला आग, दोघांचा गुदमरुन मृत्यू

भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेल्या भीषण आगीत या मॉलमध्ये असलेल्या कोविड सेंटरमधील दोघांना गुदमरुन मृत्यू झाला.  

Updated: Mar 26, 2021, 07:46 AM IST
मुंबईत मॉलमधील कोविड सेंटरला आग, दोघांचा गुदमरुन मृत्यू title=
छाया - अमोल पेडणेकर

मुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेल्या भीषण आगीत या मॉलमध्ये असलेल्या कोविड सेंटरमधील दोघांना गुदमरुन मृत्यू झाला. या मॉलमधील सनराइज रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मॉलच्या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली. तर इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहे. (Two Death in fire at Covid Center in Mumbai)

ड्रीम्स मॉलच्या पहिल्या माळ्याला रात्री बाराच्या सुमारासआग लागली होती त्यानंतर या आगीचे लोट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले.तिसऱ्या  मजल्यावर सनराइज रुग्णालय असून रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यात आले होते. आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले.

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. त्याच मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आग लागली. त्यावेळी सुमारे 70 ते 75 रुग्ण दाखल करण्यात आलेले होते. यातील बहुतेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व रुग्णांना शिडीच्या मदतीने एक-एक करून रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांना माहिती जाणून घेतली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता आता आग विझविणे आहे. आग कशी लागली, त्याचे कारण काय आहे, याची चौकशी का केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.दरम्यान, आग दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सनराइज् रुग्णालयातील निष्पापांचे बळी गेले. या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. या मॉलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हे रुग्णालय सुरू असल्याची तक्रार याआधी इथल्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून केली गेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली आहे.