... म्हणून उबेरने बंद केलं मुंबईतील ऑफिस

परंतु ग्राहकांना सेवा मिळणार आहे.     

Updated: Jul 5, 2020, 10:22 PM IST
... म्हणून उबेरने बंद केलं मुंबईतील ऑफिस

मुंबई :  कोरोना व्हायरसने जगात थैमान घातलं असून राज्यात अनलॉक-१ अंतर्गत सुरू केलेल्या सेवांमध्ये ओला आणि उबेर टॅक्सीचा देखील समावेश आहे. लॉकडाऊन हळहळू अनलॉक करण्यात येत असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळतानाच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान उबरने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका उबरला देखील बसला आहे. 

ओला आणि उबर खासगी प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत. मुंबईतील ऑफिस बंद झाल्यामुळे ग्राहकांना देखील मोठा धक्का बसला आहे. परंतु जर तुम्ही उबरचे ग्राहक असाल तर तुम्हाला उबरची सुविधा मिळत राहिल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

डिसेंबर महिन्यापर्यंत ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय उबरने घेतला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. राईड हेलिंग कंपनीने जगभरातले ६७०० कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या निर्णयानंतर उबरने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

कंपनीने जागतिक पातळीवर घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील ६०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. अनलॉक अंतर्गत मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अन्य शहरांत खासगी प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिस सेवा सुरु करण्यात आली आहे.