शिवसेनेने नाव बदलून 'ठाकरेसेना' करावे - उदयनराजे भोसले

 आता तुम्ही शिवसेनेचे नाव बदला आणि ठाकरेसेना करा, असा सल्ला शिवसेनेला उदयनराजे भोसले यांनी दिला.

Updated: Jan 14, 2020, 04:03 PM IST
शिवसेनेने नाव बदलून 'ठाकरेसेना' करावे - उदयनराजे भोसले

पुणे : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात महाराजांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली आहे. ही तुलना छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संभाजी राजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता तर साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला. शिवसेना नाव दिले तेव्हा वंशजांना विचारले होते का, असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला. महाशिवआघाडी असे नाव दिले तेव्हाही विचारले होते का? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. आता तुम्ही शिवसेनेचे नाव बदला आणि ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

मोदींची महाराजांशी तुलना : उदयनराजे संतापले 

'शिव'वडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा परखड सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज  उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.  

उदयनराजे यांची पत्रकार परिषद

कोणीतरी बिन पट्ट्याच रस्त्यावर फिरणारे, असे लिहितो, त्याची लायकी मी दाखवून देणार आहे. कोणीतरी म्हणतो वंशजांना विचारा, शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? महाशिवआघाडीतून शिव का काढलं? सोयीप्रमाणे नावाचा वापर करायचा ही कुठली पद्धत? शिवसेना या नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. विचारांचा वारसा सगळ्यां ना लाभलेला आहे, महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. दादरच्या शिवसेना भावनवरील चित्र बघा, महाराज कुठे पाहिजे होते, वंशज म्हणून आम्ही सत्तेच्या मागे कुत्र्यासारखे फिरलो नाही. खासदारकी बिसदार की सोडा, मी मनाला पटलं ते करतो. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवा तुमची वेळ संपत आली आहे, थेट इशारा यावेळी त्यांनी दिला.