Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेतेच उद्धव ठाकरे (CM Uddhav Thckeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे दोन गट पडले आहेत. याचे परिणाम आता रस्त्यावरही दिसू लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमने सामने येत आहेत.
ठाण्यातील टेंभिनाका इथं आनंद आश्रम जवळ एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिंदे समर्थक उपस्थित होते. आनंद आश्रम या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे राहायचे आणि शिवसेनेचा सर्व कारोभार या कार्यालयातून ते सांभाळत असत.
सावंतवाडी इथल्या दीपक केसरकरांच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप आलंय. सावंतवाडीत आज शिवसेनेची उद्धव ठाकरे समर्थकांची रॅली आहे. ही रॅली केसरकर यांच्या श्रीधर या निवासस्थानासमोरून जाणार आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त केसरकर यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलाय.
कोल्हापूरात उद्धव ठाकरे समर्थक आणि बंडखोर आमदार राजेंद्र यड्रावकर समर्थक आमने-सामने आलेयत. यावेळी उद्धव ठाकरे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत यड्रावकरांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तर यड्रावकरांच्या कार्यालयाबाहेर समर्थक मोठ्या संख्येनं जमले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि समर्थकांशी पोलिसांशी झटापट झाली .उद्धव ठाकरे समर्थकांनी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर याच्या कार्यालयाबाहेरचा बोर्ड पाडून टाकला.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
हडपसरमध्ये शिवसैनिकांच्या वतीने बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी हडपसर मधल्या गाडीतळ चौकामध्ये बंडखोर आमदारांच्या फोटोवर काळा शाईने फुल्या मारत जोडे मारण्यात आले.. त्यानंतर गाडीतळापासून हडपसर गावातील अमरधाम स्मशानभूमी पर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
बीडमध्येही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी बीड शहरातील सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता अर्धा तास आडवल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता. वाहनाच्या रांगाच रांगा लागल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी उद्धव ठाकरे समर्थकांनी बंडखोर एकनाथ शिंदे विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला